तो मुलगा समुद्र किना-यावर बसून रहायचा. तासन तास.
जणू कोणाची वाट पहायचा.
तो मच्छिमार म्हातारा त्याला रोज पहायचा, कुतूहलाने. पण असा एकटाच, आपल्याच तंद्रीत बसलेल्या मुलाला पाहून काही बोलायचा नाही.
एक दिवस मात्र न राहवून त्याने त्या मुलाला विचारलच..
'कोणाची वाट पाहतोस बाळा?'
त्या मुलाने म्हाता-याकडे पाहिले व म्हणाला
'पत्राची वाट पाहतोय'
'कुणाच्या पत्राची पोरा?'
'माझ्या बाबांच्या पत्राची..'
'कुठे असतात तुझे बाबा?'
'ते जहाजावर असतात. देशो देशी फिरत असतात.'
'काय काम करतो तुझा बाबा जहाजावर?'
'ते बार टेंडर आहेत. जहाजावरच्या लोकांना बारमधे दारु देतात'
'अरे पण तुझा बाबा पत्र तर तुला घरी पाठवेल..तु इथे समुद्रावर पत्राची का वाट पाहतोस? रोज तासनतास इथे का बसून असतोस?'
'माझ्या बाबांना जहाजावरुन उतरता येत नाही. त्यांना परवानगी मिळत नाही जमिनीवर यायला'
'अस्स होय !.पण मग ते पत्र कसे पाठवणार?'
'ते मला रोज एक पत्र पाठवतात.'
म्हातारा मच्छिमार हसला..मुलाच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला
'वेडा रे..जर तुझा बाबा पत्र पोस्ट करु शकत नाही तर रोज एक पत्र कसा लिहिल व तुला ते कसे मिळेल?'
मुलाने म्हाता-याकडे पाहिले व म्हणाला..
'माझे बाबा रोज एक पत्र लिहीतात..दारुच्या रिकाम्या बाटलीला स्वच्छ करुन त्यात ते पत्र घालतात. ती बाटली व्यवस्थित बंद करुन समुद्रात टाकतात..बाटली समुद्रातून वाहत वाहत जाते. मी इथे येउन त्या बाटलीबंद पत्राची वाट पहात बसतो.'
ते ऐकून म्हातारा चक्रावला...त्या इवल्याशा पोराला काय बोलावे त्याला कळेना. कळवळून तो म्हणाला
'अरे बाळा..सात समुद्र आहेत आणि त्यांचे हजारो किनारे आहेत या जगात..तुझा बाबा कोणत्या समुद्रात ती बाटली टाकत असेल..एवढे किनारे सोडून ती बाटली इथे पोचेल असा विश्वास तुला खरच वाटतो का?'
मुलगा हसला व उठून उभा राहिला. म्हाता-याला म्हणाला..
'तुझा नसेल..माझा विश्वास आहे..!! ती पहा एक बाटली तरंगत आली आहे..त्यात कदाचित....'
असे म्हणून डोळे मिचकावत तो मुलगा समुद्राकडे धावला.
Nice
ReplyDelete