Skip to main content

Featured

Dear December ❣️

 डियर दिसंबर, तुमसे इश्क़ क्यों है, ये बताना आसान नहीं ..तुम्हारे आते ही नए साल की गिनती शुरू हो जाती है,पर मेरे लिए तुम सिर्फ एक महीना या तारीख नहीं, एक दरवाजा हो—नए सफर, नई कहानियों और नए रास्तों का जो मेरी मंजिलों के और भी मुझे करीब लेकर जाता है ... तुम्हारी ठंडी हवाएं जब चेहरे को छूती हैं, लगता है जैसे पुराने गमों को उड़ाकर ले जा रही हो.. हर बार उसी मलबे में एक नई राह दिखाई है.. शायद इसलिए मैं तुम्हें हर बार एक उम्मीद की तरह देखती हूं.. तुम्हारे आते ही पेड़ों से गिरते पत्ते मुझे सिखाते हैं, कि कुछ छोड़ देना भी जरूरी होता है आगे बढ़ने के लिए.. तुम्हारी शफ्फाक शामों में, जब सूरज धीमे-धीमे डूबता है, मैं खुद को तुम्हारी गोद में एक बच्ची की तरह पाती हूं.. सहमी हुई, पर भरोसे से भरी...तुम्हारे साथ मैं अपना सारा बोझ हल्का कर देती हूं...तुम्हारी दस्तक हमेशा रहती है, एक दुआ की तरह, एक बदलाव की तरह.. तुम्हारी रूह की सर्दियों में जीते हुए, गुजरे हुए साल के लम्हों को फिर से जीती हूं ... ताकी इस गुजरे हुए साल की यादें छोड़कर आगे नए साल में बढ़ पाऊं .. नई उम्मीदों के साथ .. कुछ साथी जो साथ चल...

Draupadi..

सीता आणि द्रौपदी-दोघी दोन महाकाव्यांच्या नायिका- दोन आदिग्रंथांच्या नायिका. दोघीही भूमिकन्या. सीता यज्ञासाठी जमीन नांगरताना सापडली तर द्रौपदी यज्ञातूनच वर आली. दोघींची लग्नं म्हणजे पण लावून झालेली स्वयंवरं होती. दोघींनाही वनवास भोगावा लागला. सीतेला चौदा वर्ष आणि द्रौपदीला तेरा वर्ष. दोघींचंही आयुष्य शेवटी तसं विफलच झालं... सीतेच्या अपहरणाचा दोष सीतेकडेच जातो. राम-लक्ष्मणांकडे नव्हे. तिच्या दु:खाचं स्वरूपही निराळं. तिच्यावर आपत्ती कोसळतात पण त्यांचं निवारण होतं. प्रत्येक आपत्तीतून ती आणि तिची माणसं सुखरूप बाहेर पडतात. नव्हे आणखीच थोर, दैवी होऊन बाहेर पडतात. द्रौपदीचं तसं नाही. तिचं दु:ख मानवी आहे. तिच्या नातलगांनी तिला दु:खं दिली. भारतीय युद्धाचं कारण द्रौपदी होती असं मानलं गेलं आहे पण ते खरं नव्हे. कलहाची बीजं तर कौरव-पांडवांच्या बालपणीच पेरली गेली होती. पण त्या युद्धाची झळ द्रौपदीनं फार सोसली. तिला युद्ध हवं होतं हे खरं, पण त्या युद्धात तिचं माहेर धुवून निघालं. तिची सगळीच्या सगळी कर्ती मुलं गेली. राखेचं राज्य वाट्याला आलं. यादवांच्या मातबर कुळाचा अस्त झाला. तो युगान्तच होता आणि इरावतीबाईंनी म्हटल्याप्रमाणे त्या युगान्ताची प्रत्येक यातना द्रौपदीनं भोगली.


द्रौपदीचा जन्म यज्ञज्वाळेतून झाला. यज्ञसेन द्रुपदाची मुलगी म्हणून ती याज्ञसेनी. पण आपल्या मनात मात्र तिच्या नावाची सांगड यज्ञज्वाळेशीच घातली गेली आहे. द्रौपदी यज्ञातून आली, पण तो यज्ञ काही द्रुपदानं तिच्यासाठी मांडलेला नव्हता. द्रोणाशी द्रुपदाचं वैर होतं. द्रोणाचा वध करणारा पुत्र मिळावा या हेतूनं द्रुपदानं यज्ञ मांडला. त्या यज्ञातून धृष्टद्युम्न आला तशी द्रौपदीही आली. अनपेक्षित, अनाहूत आली. शिवाय ती मूल म्हणून, बाळ म्हणून आली नाही. कुमारी म्हणून आली... यज्ञवेदीतून वर आलेली पांचाली कुमारी होती. सर्व अवयवांनी देखणी होती, लावण्यवती होती. तिचे डोळे मोठे होते. कमळाच्या पाकळीसारखे. रंग सावळा. केस घनदाट, काळे आणि कुरळे. टपोरी तांबूस नखं. सुरेख भुवया. सर्वागी मृदुता आणि कोवळीक भरलेली. स्तन मोठे. असं वाटत होतं की मानवरूप घेतलेली कुणी स्वर्गकन्याच आहे. निळ्या कमळासारखा तिचा देहगंध साऱ्या परिसरात दरवळत होता. तिला या जगात उपमाच नाही. देव, दानव, यक्ष अशा सगळ्यांनीच जिची इच्छा करावी अशी ती देव-रूपा होती. व्यासांनी इतक्या तपशिलांसह रूपाचं वर्णन भारती कथेत एकट्या द्रौपदीचं केलं आहे.

या कथेतल्या नायिकेचं अवतरण किंवा उद्धरण – यज्ञज्वाळेतून तिचं वर येणं – मात्र अद्भुताच्या प्रकाशानं वेढलेलं. तिचा जन्म यज्ञातून झाला, पण तिचं सगळं आयुष्य म्हणजेच खरं तर एक यज्ञ होता. एक प्रकारे स्त्रीत्वाच्याच प्रतिष्ठेसाठी व्यक्तिगत दु:खाची आणि विटंबनेची सतत आहुती देत चाललेला यज्ञ. शेवटी विझल्यावर राखच मागे ठेवणारा यज्ञ. हा यज्ञ मांडणारी द्रौपदी कायम आतून जागी असणारी स्त्री होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक निकराच्या प्रसंगी तिची आतली जागही दिसते आणि आगही दिसते. स्वत्व न सोडणाऱ्या दुर्मिळ स्त्रियांपकी ती एक होती. ती पांडवांशी बांधली गेली होती म्हणून तिला पुष्कळ काही सहावं लागलं. पण ती मुकाट्यानं सहन करत राहिली नाही. नाइलाजानं स्वीकाराव्या लागणाऱ्या प्रत्येक नकोशा गोष्टींना दूर करण्यासाठी तिनं तडफडाट केला. प्राण पाखडले.

द्यूतसभा हे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसं आहे. कोणाही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये इतकी विटंबना तिथे तिच्या वाटय़ाला आली. त्या काळच्या प्रथेप्रमाणे रजस्वला असल्यामुळे एकवस्त्रा असलेल्या तिला केसांना धरून खेचत, फरफटत सभेत आणलं गेलं. तिथे राजा होता, कुटुंबामधले आणि दरबारामधले इतर वृद्ध होते, तपस्वी होते, योद्धे होते आणि द्यूतात स्वत:लाही गमावून बसलेले तिचे पाच पती होते. द्रौपदीनं त्या सर्वाच्या मर्यादा उघडय़ा केल्या. स्वत:च्या उघडं होण्याची लाज बाळगून ती शरमेनं आणि दु:खानं चिरडून मोडून पडती तरी ते स्वाभाविकच होतं, पण ती मोडली नाही, कोसळली नाही. तिच्यातून ठिणग्याच बाहेर पडल्या. ‘ही कसली सभा ?’ ती म्हणाली. ‘सभा तीच जिथे ज्येष्ठांची उपस्थिती असते. ज्येष्ठ- वृद्ध तेच, जे धर्माचं निरूपण करतात. धर्म तो, जो सत्याला सामावतो आणि सत्य तेच ज्यात किंचितही कपट नसतं.’ द्रौपदी नकाराच्या भाषेत सभेची, अनुभवी वृद्धांची, धर्माची आणि सत्याचीच व्याख्या करू पाहत होती. हतप्रभ ज्येष्ठांना भानावर आणू पाहत होती. तिचं आवाहन होतं माणसांमधल्या धर्मबुद्धीला, न्यायबुद्धीला, राजकुळाच्या प्रतिष्ठेला आणि करुणेला नव्हे तर सदसद्विवेकाला. तिला सहानुभूती नको होती. दया नको होती. तिला आत्मसन्मान हवा होता. द्रौपदीनं भर सभेत बोलणं आणि युधिष्ठिरानं आधी कुणाला पणाला लावणं असा प्रश्न विचारणं इरावतीबाईंना वेडगळ, नव्हे भयानक वाटलं. ‘पंडिता’ हे अरण्यपर्वात तिला दिलेलं विशेषण उपहासाचं वाटलं. पण खरं तर त्या अत्यंत कठीण प्रसंगातही तिची आत्मप्रतिष्ठेची जाणीव, तिची न्यायाची जाणीव आणि तिची धर्मबुद्धी पूर्ण शाबूत होती. भीष्मांनीही तिच्या त्याच जागृत धर्मबुद्धीचं आश्चर्य व्यक्त केलं, पण ते तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत.

गांधारी सभेत आली, तिनं धृतराष्ट्राला जागं केलं आणि त्यानं द्रौपदीची विटंबना थांबवून तिला तीन वर देऊ केले. या प्रसंगात द्रौपदी अगदी अंतर्बाह्य़ उजळून निघाली आहे. पहिल्या वरानं तिनं युधिष्ठिराची दासपणातून मुक्तता केली. त्याचा मुलगा- पांडवांचं कुळ पुढे नेणारा एक मुलगा तरी दासपुत्र असू नये अशी व्यवस्था तिनं केली. दुसऱ्या वरानं तिनं चारही पांडवांची शस्त्रसहित मुक्तता केली आणि तिसरा वर तिनं मागितलाच नाही. इरावतीबाईंनी कर्णाचे त्या वेळचे उद्गार नेमके अधोरेखित केले आहेत. ‘द्रौपदीनं पांडवांना अप्रतिष्ठेपासून वाचवलं, गत्रेतून वर काढलं, बुडताना किनाऱ्याला पोचवलं.’ असं कर्ण म्हणाला. पण त्याहीपेक्षा अधिक तिनं आपल्या पराभूत आणि हतप्रभ पतींवरचा विश्वास व्यक्त केला. त्यांची अवहेलना करणाऱ्या त्या सभेत त्यांच्या पुरुषार्थावरचा दृढ विश्वास प्रकट करून ती म्हणाली, ‘लोभानं सर्वनाश होतो. मी आता तिसरा वर मागणं अयोग्य आहे. माझे पती गत्रेतून पार झाले आहेत. त्यांचं कर्म जर पवित्र असेल तर पुन्हा आमचं कल्याण होईल.’ विवेक आणि संयम यांचं दर्शन आणीबाणीच्या प्रसंगीही नित्यजागृत माणसांच्या वागण्या-बोलण्यातून होत जातं याचा द्रौपदीनं दिलेला हा अपूर्व अनुभव म्हणायला हवा. तिच्या वस्त्रहरणाचा प्रसंग भांडारकर संशोधन संस्थेच्या संशोधित आवृत्तीत प्रक्षिप्त मानला गेला आहे; पण तो काव्यात्म न्याय माणसांच्या मनाला शतकानुशतकं भावला आहे, आवश्यकच वाटत आला आहे.

द्रौपदीचं तरुण सुंदर कुमारिका म्हणून जन्माला येणं, देव, दानव, यक्षांनाही काम्य अशा देहस्विनीचं रूप तिला लाभणं, यज्ञीय अग्नीशी तिचा संबंध असणं, तिच्या तेजापुढे अनेकदा तिचे पतीही निष्प्रभ वाटणं, वरारोहा असं विशेषण तिच्यासाठी वापरलं जाणं, तिला युद्ध हवं असणं, तिच्या स्वभावात न शमणारी जळती आग असणं यामागे केवळ व्यासांचा प्रतिभाविलास असावा असं वाटत नाही. पण मग द्रौपदीचं हे रूप असं का, याचं उत्तर अभिजात परंपरेत सापडत मात्र नाही. उत्तरासाठी वळावं लागतं ते लोकपरंपरेकडे आणि या देशाच्या दक्षिणभूमीवर आजही जिवंत असणाऱ्या देवी द्रौपदीच्या उपासनेकडे. महाराष्ट्रात पांडवांनी खोदलेली म्हणून मानली जाणारी पांडवलेणी, पांडवांनी उभी केलेली म्हणून मानली जाणारी मंदिरं दाखवता येतात. ज्यांचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही अशी अनेक मंदिरं पांडवकालीन म्हणून दाखवली जातात.

पण अद्याप सुस्थितीत असलेलं पाच पांडव आणि द्रौपदी यांचं एकमेव मंदिर आहे ते पुण्याजवळ तळेगावला आहे. लोकशैलीतले बैठ्या आसनातले पाच पांडव आणि त्यांच्या मागे देवळाच्या मध्य भिंतीपलीकडे आडवी झोपलेली द्रौपदी असं ते मंदिर आज पूजेत नाही. नांदत्या उपासनेत नाही. उपेक्षित असं ते आडबाजूला असलेलं एकमेव मंदिर आहे. द्रौपदीची देवी म्हणून उपासना दक्षिणेकडे मात्र आजही टिकून आहे. मुख्यत: तामिळनाडू आणि त्याच्या सीमांना लागून असलेल्या आंध्र, कर्नाटकात द्रौपदीची अनेक देवळं आहेत. चेन्नईजवळचं जिंजी हे तिचं मुख्य ठाणं. तिथून दक्षिणेला वैगाई नदीच्या पलीकडे अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वसमुद्रापासून थेट केरळच्या सीमेपर्यंत तिची देवळं आहेत. जिंजी, महाबलीपुरम्, चेन्नईच्या आसपास ती अधिक आहेत, पण इतरत्र कावेरी, चेय्यार, पालार अशा नद्यांच्या काठानं ती विखुरलेली आहेत. या देवीचे भक्त हजारोंच्या संख्येनं आहेत. त्यांत मुख्यत कोनार आहेत. ते यादव आहेत. कृष्णाच्या कुळातले आहेत. म्हणून त्यांचा मान उपासनेत मोठा आहे. वण्णियार आणि मुतलीयारही या भक्तांमध्ये सामील आहेत. या भक्तांनी द्रौपदीचे वार्षिक उत्सव मोठे गाजते ठेवले आहेत. मस्तकावर करगा म्हणजे घट घेऊन आगीवरून- निखाऱ्यावरून चालत जाणारे देवीचे पुजारी द्रौपदीच्या उत्सवांमधून पाहायला मिळतात.

या देवीचा अभ्यास करणाऱ्या हिल्टबीटलसारख्या अभ्यासकांना वाटतं की द्रौपदी ही एकेकाळची मातृदेवतांपकी एक देवता असावी. संस्कृतीच्या आदिपर्वातली देवता. पुरुष देवांवर वर्चस्व गाजवणारी, अनियंत्रित सत्ता असणारी, सर्जनाची अमर्याद शक्ती असणारी देवता. तिच्या उपासनेत पुरुष गौण होता. कित्येकदा तर तिचा बळीही तोच होता. काळाच्या ओघात पितृप्रधान संस्कृतीनं या देवतांची निरंकुश सत्ता संपुष्टात आणली. मातृदेवतांचं स्वतंत्र महत्त्व संपलं आणि त्या पुरुष देवांच्या सहचरी म्हणून गौण स्थानावर गेल्या. मात्र काही देवतांनी स्वत:ची मूळ ओळख दूर ठेवण्याला नकार देत आपलं आदिम रूप कायम राखलं. त्यांच्या उपासनांना संपूर्ण संस्कृत रूप देणं अभिजनांना शक्य झालं नाही. त्यांच्या उपासनांमध्ये, विधिविधानांमध्ये, क्षेत्रमाहात्म्यांमध्ये, यात्रा-जत्रांमध्ये आणि त्यांच्या चरित्रकथांमध्येही त्या देवतांचं प्राचीन, उग्र आणि स्वतत्र रूप कायम राहिलं. याचं आपल्याकडचं परिचित उदाहरण रेणुकेचं आहे. रेणुकेप्रमाणेच तामिळनाडमध्ये ते द्रौपदीचं आहे. खरं तर आपल्याकडच्या महाकालीची रेणुका ही बहीण मानली जाते आणि गडचांद्याच्या महाकालीचे उपासक जी गाणी म्हणतात, त्यांत महाकाली, रेणुका आणि धुरपतामाय ही एकाच देवतेची रूपं मानून त्यांचा जयजयकार करतात. जिंजीचे पुजारी द्रौपदीसाठी जी तमिळ स्तोत्रं म्हणतात त्यात ते तिला आई म्हणतात आणि तिने जसा पांडवांचा सांभाळ केला तसा आमचाही करावा, अशी विनवणी करतात. एका गाण्यात ती ‘पाच पतींनाही अस्पर्श असलेली कुमारिका’ आहे आणि ‘आदिअरण्यात नांदणारी आदिमाता’ही आहे.

द्रौपदीचं हे ‘आई’चं रूप महाराष्ट्रात फक्त गडचांद्याच्या महाकालीच्या उपासनेत मौखिक गाण्यांत आढळतं आणि कृष्णदास दामा नावाच्या सोळाव्या शतकातल्या एका कवीनं रचलेल्या महाभारताच्या आदिपर्वात, त्यानं गुंफलेल्या एका लोकपरंपरेतल्या कथेत आढळतं. कथा अशी आहे की द्रौपदीसह पांडव वनवासात असताना भीमाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात तो द्रौपदीला देवी म्हणून मंचकावर बसलेली पाहतो. त्या स्वप्नात युधिष्ठिर तिचे पाय चेपत असतो. भीम ते स्वप्न युधिष्ठिराला सांगतो आणि त्या स्वप्नाचा अर्थ विचारतो. तेव्हा मध्यरात्री रानातल्या एका विशाल वटवृक्षाजवळ लपून राहण्याची आणि प्रत्यक्षपणेच सत्य जाणून घेण्याची युक्ती युधिष्ठिर त्याला सांगतो. त्या मध्यरात्री भीम पाहतो ती एका भव्य स्वागताची तयारी आणि मग अवकाशातून, एका दिव्य सिंहासनावर बसून अवतरलेली देवी- द्रौपदी. तिच्यापुढे युधिष्ठिरच नव्हे तर कृष्णासह सारे देव हात जोडून उभे राहतात. तिची स्तुती गातात आणि तिचा आशीर्वाद मागतात. कृष्ण मागतो ते भारती कथेतल्या पांडवांचं प्राणरक्षण. पण ती त्याला तयार होत नाही. तिचा रक्तघट तिला भरून हवा असतो. पांडवरक्षणाच्या बदल्यात रक्तघट पुरा भरण्याचं वचन कृष्ण तिला देतो. त्यानुसार युद्ध घडवतो, कौरव संहार होतो पण रक्तघट पुरा भरत नाही. शेवटी कृष्ण यादव कुळाचा संहार घडवतो आणि स्वत:चं आयुष्य अर्पण करून तो घट काठोकाठ भरून देतो. भीमाला द्रौपदीचं आदिमायेचं रूप उलगडतं आणि आपल्यालाही द्रौपदीच्या मूळ मातृदेवता रूपाचं दर्शन होतं. रक्तघटाची तहान लागलेली ही उग्र देवी, आदिमाता, आदिपुरुष कृष्णाचा बळी घेऊन तृप्त होते. तामिळनाडमधली द्रौपदी जशी आदिमाय आहे तशी ती कुणाही पुरुषदेवाची सहचरी नाही. कुणाचीही अंकित नाही. ती कुमारी आहे. तिच्याशी रतिसंबंध ठेवायचा, तर मत्स्यभेद करूनच तो अधिकार मिळवायचा. तो अर्जुनानं मिळवला. कर्नाटकात कोलार नावाच्या गावी द्रौपदी मंदिराच्या नवरात्रोत्सवात या कथेचं सादरीकरण होतं.

द्रौपदीच्या व्यक्तित्वातला सकामतेचा तंतू दुर्गाबाईंनी जसा तिच्या आकलनातलं मुख्य सूत्र म्हणून भारती कथेत सूक्ष्मपणे विणला गेलेला पाहिला, तसा तो लोकपंरपरेत अधिक स्पष्टपणे विणलेला आहे. तिचं पंचपतित्व त्याच सकामतेचा एक परिणामस्वरूप भाग आहे. कथा अशी सांगितली जाते की शंकर-पार्वती सारीपाट खेळत असताना माजावर आलेली कामधेनू त्यांनी धावत जाताना पाहिली. तिच्यामागे पुष्कळ गोऱ्हे लागले होते. पार्वती तिला पाहून हसली, तेव्हा रागावून कामधेनूनं शाप दिला की तूही पृथ्वीवर जाऊन पडशील. तुला एकापेक्षा जास्त नवरे मिळतील आणि शंभर कौरव तुझ्यामागे लागतील... पार्वती ही आदिमाता मानली गेली आहे. तिचं आणि द्रौपदीचं एकरूपत्व या कथेनं स्पष्ट केलं आहेच, पण द्रौपदीच्या व्यक्तित्वातली सकामता आणि त्यामुळे तिच्यावर येणारी संकटं यांचीही सांगड घातली आहे. दुर्योधन-दु:शासनानं तिची स्त्री म्हणून विटंबना करू पाहणं, कर्णानं तिला पाहून गाय गाय म्हणून ओरडणं, तिच्या पंचपतित्वामुळे तिचं चारित्र्य कायम आक्षेपार्ह ठरणं आणि तिच्याशी गरवर्तन करण्याचा मोह पुरुषांना वारंवार होणं या सगळ्याचं मूळ लोकपरंपरेनं घातलेली ही जी सांगड आहे, तिच्यातच आहे. पाच इंद्र आणि इंद्राणी यांनी पांडव आणि द्रौपदी यांचं रूप घेतल्याची कथाही लोकपरंपरेतली याच सारणीची कथा आहे.

महाभारतातली द्रौपदी मुक्तकेशा आहे. तिच्या उपासनेतही मोकळ्या केसांना महत्त्व आहे. दु:शासनाच्या रक्तानं माखलेल्या हातांनी भीमानं तिचे केस पुन्हा बांधले आहेत. रक्त हा मातृदेवता उग्र द्रौपदी देवीच्या संदर्भात अपरिहार्य घटक आहे. ती स्वत: रक्त माखल्यासारखीच आहे. तिला संहाराची, रक्ताची तहान आहे. दुष्टसंहार करावा आणि ते रक्तसिंचन स्वत:वर करून घ्यावं अशी तिची मागणीच आहे. अनेक उग्र देवतांच्या उपासनेत देवतेवर बळीचं रक्त शिंपडलं जातं. द्रौपदीच्या भारती कथेत त्या रक्ताचा संदर्भ फार अर्थपूर्णतेनं ओवला गेला आहे... अभिजात परंपरेनं कदाचित तिला उग्र अशा उपासनेच्या लोकपरंपरेपासून दूर करण्यासाठी काही कथा रचल्याही असाव्यात. एका मुनिकन्येनं तप केलं. शिव तिला प्रसन्न झाला तेव्हा अत्यानंदानं ती त्याला पाच वेळा ‘तूच माझा पती हो’ असं म्हणाली. ती मुनिकन्या पुढे द्रौपदी झाली आणि शिवानंच पाच पांडवांचं रूप घेतलं, अशी एक शोभन कथा आहे. लोकपरंपरेतली द्रौपदी ही साक्षात् भूदेवता. तिचं मूळचं रूप हिंस्र आणि धगधगतं. पुरुषांना आकर्षति करणारं आणि प्रसंगी गिळंकृतही करणारं. महाभारतातल्या द्रौपदीमध्येही तो धगधगता संताप उतरून आलेला आहे. लोकपरंपरेतल्या एका उग्र, आदिम देवतेचा भारती कथेशी असा संबंध पाहिला की एखादं धार्मिक वास्तव साहित्यरूप कसं घेत असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

व्यास तर प्रज्ञावंतच होते. सीता म्हणजे नांगरलेली जमीन, पांढर! आणि द्रौपदी म्हणजे न नांगरलेली कुंवार जमीन! जंगली, स्वयंतंत्र. काळी. असाही एक अर्थ या दोघी भूदेवतांचा विचार करताना लागू शकतो... भूदेवी सीतेला उचलताना समकालीन आदर्शाच्या मुशीत तिला घालण्याचा प्रयत्न वाल्मिकींनी केला. द्रौपदीला मात्र व्यासांनी कोणत्या एका मुशीत घातलं नाही. त्यांनी तिला उचललं ते तिच्या मुळांसकट. म्हणून ती पूर्ण आदिम प्रेरणांनी भरलेली राहिली. तिच्या आदिरूपाचे, त्या रूपांच्या उपासनेचे किती एक घटक तिच्या व्यक्तित्वात आणि आयुष्यकथेत काही तसेच आणि काही थोडय़ा बदलत्या स्वरूपात उरून राहिले. परिणतप्रज्ञ व्यासांच्या प्रगल्भ कृतीत लोक आणि अभिजाताचा अनोखा मेळ जिच्यामुळे घातला गेला ती अस्पर्श द्रौपदी मात्र अजून स्त्रीत्वाच्या रहस्यासारखी दोन्ही परंपरांना भूल घालत सर्वापलीकडे सर्वापासून दूर आणि गूढच राहिली आहे.

Comments

Popular Posts