"पर्यायी नात्यांच्या" पर्यायाने मूळ नात्यांची समीकरणं बदलतात ती कायमची...
पूर्वी नात्यांचा आदर, कदर, नातं प्रामाणिकपणे निभावणं हे सुसंस्कृत आणि सुसंस्कारी मनाच लक्षण मानल जायचं पण काळ बदलला आणि अनैतिक मुल्यांचं ग्रहण नात्यांनाही लागलं.मैत्री ,प्रेम ,जिव्हाळ्याची नातीसुद्धा कालांतराने निष्ठेचं, प्रामाणिकपणाचं काेंदण झूगारून देऊ लागली.पर्याय निर्माण झाले आणि माणसं विखुरली गेली.
"हे नाही तर ते"च्या भुलभुलैयात मन इतकं अडकलं की नात्यात स्थैर्य किंवा स्थैर्यासाठी नाती ही संकल्पना आऊट डेटेड झाली.माणसांच्या रंगेल, असंतुष्ट आणि विकारी वृत्तीला पर्यायांच्या निरंतर शाेधाचं व्यसन लागलं आणि मग त्याला " व्यक्तीगत स्पेस" असं गाेंडस नाव मिळालं
सरड्यासारखी कमिटमेंट बदलणारी माणसं बघून नात्यांवरचा विश्वास मात्र उडू लागला. इतरांचा सतत पर्याय म्हणून वापरणार्यांना कुठे थांबले पाहिजे ह्याचं भान उरलं नाही.
पण खरी शाेकांतिका हीच आहे की गरजेप्रमाणे नात्यांना पर्याय म्हणून वापरणारेच अधिक यशस्वी हाेताना दिसतात.
अशा लाेकांना त्यांच्या सुदैवाने माणसही अनेकदा ठेच लागूनही त्यांच्यावर विश्वास ठेवणारी, पुन्हा पुन्हा क्षमा करणारी भेटतात. अनेकांच्या यशाचा डाेलारा हा अशाच वापरून दूर केलेल्या नात्यांच्या पायावर उभा असताे.
जग बदलतयं नक्कीच पण ते इतकही बदलू नये की एकाच्या जगण्याच्या व्याख्येत दुसर्यांच्या आयुष्याची हाेळी असेल. माणसांना , नात्यांना पर्याय शाेधताना एका आत्मचिंतनाची गरज असतेच....आपल्या मनाची चंचलता ही "पर्यायांच्या शाेधाचं" मूळ तर नाही ना ह्याचं परिक्षण केलच पाहिजे...
थाेडक्यात आपल्या मनाचही ऑडीट गरजेच नाही का ?
Comments
Post a Comment