वारकरी सांप्रदाय महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो.
ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात.
तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहेज्यांना वर्षातून एकदाच म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला येणे शक्य असते त्यांनी तसे केले तरी चालते परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही.
माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय.
पंढरीची वारी :
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो
ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज,तुकाराम महाराज,मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक
डॉ.सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे.
वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच.
Comments
Post a Comment